महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळं 90 जणांचा मृत्यू, 1500 रूग्ण; आरोग्य मंत्री टोपे म्हणाले – ‘सर्वांचे फ्रीमध्ये होणार उपचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगसने आत्तापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे सध्या 1500 रुग्ण आढळले आहेत. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत.

ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका मधुमेह (डायबिटीज) असलेल्या लोकांना आहे. याबाबत राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रात आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसने 90 जणांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर स्थिती आहे. त्यामुळे याला आपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ब्लॅक फंगसचा आजार रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाने स्टेरॉईडचा वापर करू नये. राज्यात सध्या 1500 रुग्ण आहेत. त्यापैकी 850 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 500 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. म्युकरमायकोसिस या आजारात एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनची मागणी केली जात आहे. तसेच राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत दिले जाणार आहे.

याशिवाय या आजारासाठी प्लास्टिक सर्जन, न्यरोसर्जन, डेंटिस्ट या सर्वांची गरज आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 1000 रुग्णालयांत सूचीबद्ध केले गेले आहे. तिथे मोफत उपचार केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत 1.5 लाखांचा कव्हर दिला जातो, असेही म्हटले आहे.