12 वी परीक्षा : ‘या’ केंद्रावर व्यवस्थेचे ‘तीन तेरा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. खरेतर शैक्षणिक दृष्टीने १० वी आणि १२ वी चे वर्ष म्हणजे महत्वाचा टप्पा मानला जातो. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असा कितीही दावा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला असला तरी तो फोल ठरल्याचे चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळाले. औरंगाबादेतून ४० किमी अंतरावर असलेल्या पोरगाव येथील केसरबाई हायस्कुल परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींनी चक्क जमिनीवर बसून इंग्रजीचा पेपर सोडवला. एव्हढेच नाही तर येथे एका बाकावर तीन विद्यार्थी बसले होते.

धक्कादायक… मोदींच्या सभेत पाण्याअभावी विद्यार्थीनीचा मृत्यू 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. औरंगाबाद विभागात १ लाख ६८ हजार २५१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. औरंगाबादजवळील पैठण तालुक्यातील केसाबाई हायस्कूल पोरगाव येथील केंद्रावर विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. विद्यार्थी जमिनीवर बसूनच परीक्षेचा पेपर सोडवत होते. आसनव्यवस्था अपुरी होती. एका बाकावर तीन विद्यार्थी बसले होते. तर शिक्षकच काही प्रश्नांची उत्तरे सांगत होते. महसूल विभागाचे पथक, भरारी पथकही तिथे नव्हते. त्यामुळं कॉपीमुक्त परीक्षा केवळ कागदावरच असल्याचं चित्र होतं.