24 आठवडयांच्या अल्पवयीन बलात्कार पिडीतेस ‘गर्भपात’ करण्याची मुंबई हायकोर्टानं दिली पवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 17 वर्षाच्या बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुलीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून न्यायमूर्ती एस.जे. काठवाला यांनी जे.जे. रुग्णालयातील 24 आठवड्यांच्या या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाने पीडितेची प्रकृती ठीक असल्याचे न्यायालयाला सांगितले.

न्यायमूर्ती काठवाला यांनी 15 मे रोजी पीडितेची स्थिती जाणून घेण्यास व कोर्टाला अहवाल सादर करण्यास बोर्डाला सांगितले होते. जेव्हा पीडित मुलीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले की, गर्भवती असल्यामुळे तिला मानसिक त्रास होत आहे आणि पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि स्वत:चे भविष्य घडवण्यासाठी गर्भपात करु इच्छित आहे. तिच्या जबाबानंतर कोर्टाने गर्भपात करण्याचे निर्देश दिले.

डॉक्टरांच्या बोर्डाने सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले की गर्भामध्ये कोणतीही समस्या नाही, परंतु पीडित मुलीला नंतर गर्भधारणेदरम्यान त्रास होऊ शकतो. वैद्यकीय मंडळाने म्हटले आहे की, तिला स्वत:ला गर्भधारणेची इच्छा नसल्यामुळे मुलाला जन्म देण्यास भाग पाडल्यास तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोर्टात अल्पवयीन मुलीच्या आईच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती त्यावेळी डॉक्टरांच्या मंडळाने आपले म्हणणे कोर्टासमोर सादर केले.