‘कोरोना’चा वेग अटोक्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी : सर्व्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला यश आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर आणि त्यांच्या सहायक प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालासाठी दोन्ही संशोधकांनी राज्यातील आणि विविध जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा प्रशासनाकडून जाहीर होणारा आकडा ग्राह्य धरला आहे. या अहवालामध्ये शहरात साथीचे आजार वाढण्याची कारणे नमूद करण्यात आली आहेत.

यामध्ये मुंबईसारख्या शहरातील दाटवस्ती, तिथे नसलेल्या पायाभूत सुविधा या बाबी देखील कारणीभूत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अहवालात मुंबई सारख्या शहरामध्ये योग्य व सुनियोजित गृहनिर्माण धोरणाची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्राध्यापक नीरज हातेकर म्हणाले, कोरोना बाधितांचा वेग मंदावला असला तरी वाढलेली चाचणी संख्या, मोठी असलेली लोकसंख्या यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील 42 टक्के लोकसंख्या ही शहराच्या 9.5 टक्के भागात झोपडपट्टीत राहते. अशा गर्दीच्या ठिकाणी फिझिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढून विषाणूचा प्रसार वेगाने वाढतो.

राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात रोज सलग दोन हजाराच्या घरात नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर बुधवारी एका दिवसात सर्वाधिक 105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे राज्याचा रुग्ण दुप्पटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता. तो काल 14.7 दिवस झाला आहे. तर रुग्णांची बरे होण्याची संख्याही नियमित वाढत आहे. काल 1168 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.5 टक्के एवढे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like