महाराष्ट्र बजेट 2020 : शेतकर्‍यांसाठी ठाकरे सरकारनं कर्जमुक्तीसह केल्या ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा, जाणून घ्या

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या बजेटमध्ये सरकारने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी शेतकऱ्यांकरिता महत्वाचा काही घोषणा करण्यात आल्या.

शेतीसाठी दिवसभर पाणीपुरवठा होण्यावर भर

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १ लाख या प्रमाणे ५ लाख सौर कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात ६७० कोटी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा दिवसा करण्यावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार

भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘मुख्यमंत्री जलसंधारण योजना’ राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागासाठी १०,०३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऊसासह इतर पिकांच्या ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येईल, असं देखील त्यांनी सांगितलं. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणादेखील अजित पवारांनी केली.

अर्थमंत्र्यांच्या ५ ठळक घोषणा

१)महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद
२)शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १ लाख या प्रमाणे ५ लाख सौर कृषीपंप बसवण्यात येणार
३)जलसंपदा विभागासाठी १०,०३५ कोटींची तरतूद
४)ऊसासह इतर पिकांच्या ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येईल
५)नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार

सध्या महाराष्ट्रासमोर असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. मागील सरकारची कर्जमारी दीड वर्ष चालली. आम्ही मात्र ती प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करू, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी समोर बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.