Maharashtra Budget 2021 : भाजप आमदारांची घोषणाबाजी, बारामती अन् पवारांचा उल्लेख केल्यानंतर फडणवीसांना हसू आवरेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत सादर केला. त्यानंतर अर्थमंत्र्यांचे अर्थसंल्पीय भाषण झाल्यानंतर भाजपचे आमदार विधिमंडळातून बाहेर पडले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी पत्रकार उपस्थित होते. प्रश्नोत्तराला सुरुवात करण्यापूर्वीच भाजप आमदारांनी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा धिक्कार असो, पुणे-बारामतीसाठी अर्थसंकल्प मांडणाऱ्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी आमदारांनी केली. भाजप आमदारांनी थेटपणे बारामतीचा आणि अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा उल्लेख केल्यानंतर फडणवीसांना मात्र हसू अनावर झाल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प म्हणाव की काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प म्हणावे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. अजित पवारांनी केलेल्या घोषणांमध्ये बरेचसे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत. यातले काही प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने प्रगतीपथावर आहेत. त्यात अनेक रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. एका बाजूला केंद्राला नाव ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख स्वत:च्या अर्थसंकल्पात करायचा, अशी सोयीस्कर भूमिका राज्य सरकार घेत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाण असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही. केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा. मात्र इतर वेळी केंद्रावर टीका करायची, हेच महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. अर्थसंकल्पात त्याचा प्रत्यय आल्याचे फडणीस म्हणाले.