‘राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम’ – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. तर या अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. तर भाजपचे आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधत, राजकीय किमान समान फसवणूक करुन सत्तेत आलेल्या तिघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची किमान समान फसवणूक कार्यक्रमच आहे, असा घणाघात शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासन पूर्तीचा कोणताही कार्यक्रम नाही. शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक असे अनेक समाज घटक कोरोनामुळे अडचणीत आले त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद नाही अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हे सरकार विसरले तसेच पहिल्या अधिवेशनात विधानभवनात ज्या बारा बलुतेदारांना आणून त्यांच्या सोबत फोटो काढले त्या बारा बलुतेदारांना कोरोना काळात काही दिले नाहीच, तर वीज बिलात माफी नाही, पेट्रोल डिझेल भाव कमी करु सांगितले त्याबद्दल कोणती घोषणा नाही. आँनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नाही. असे अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

पुढे शेलार यांनी महाविकास सरकारने मुंबई संदर्भात केलेली घोषणा ही मुंबईतील भाजपा सरकारच्या काळातील जुन्या प्रकल्पांची नावे फक्त वाचून दाखवली आहे. तर विशेष म्हणजे मुंबई पालिकेच्या बजेटमधील प्रकल्प प्रथमच राज्याच्या बजेटमध्ये दाखवून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री मुंबईकरांसाठी काहीतरी देतील अशी अपेक्षा असलेल्या मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची टीका त्यांनी केली आहे.