हा काही अर्थसंकल्प नाही, शेतकर्‍यांना दिलेल्या वचन ‘भंग’, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. टीका करताना ते म्हणाले आज विधानसभेत सादर झालेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ भाषण आहे, अर्थ संकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसतं भाषण केलं. शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं. हे केवळ अर्थमंत्र्यांचं भाषण होतं. त्यात कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण नव्हते. नव्या वर्षात काय अपेक्षित आहे, किती तूट राहिली किंवा अधिक्य राहिलं अशा कुठल्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले.

अर्थसंकल्प समतोल नाही, विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारला राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे देखील येते याचा विसर पडला आहे. या विभागांसाठी काहीही देण्यात आलेले नाही. अर्थमंत्र्यांनी भाषणात केवळ कोकणाचा उल्लेख केला. पण, खरं तर कोकणाच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली आहेत. कर्जमाफीची घोषणा करताना, मुदत कर्जासंबंधित कुठलीही घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊच शकत नाही असे म्हणते कर्जमाफीवरुन त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार, 50 हजार आणि 1 लाख रुपये मदत देण्याचे वचन दिले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा भंग केला आहे, अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना एक नवा पैसा सरकाराने अर्थसंकल्पातून दिला नाही. महिला, युवक, शेतकरी आदी कुठल्याही घटकांकरिता नव्या योजना नाहीत. मंदीची भीती दाखवून केवळ अपयश लपवण्याचा प्रयत्न या सरकाराने केला आहे अशी टीका देखील फडणवीसांनी केली.