आधी सावरकरांना भारतरत्न द्या, आम्ही तुमचेही अभिनंदन करु, शिवसेनेनं भाजपला सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपकडून आज राज्य विधानसभेत मांडलेला सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभाध्यक्ष नाना पटोलांनी यांनी नियमांचे कारण देत फेटाळून लावला. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने त्यांच्या गौरवाचा दोन ओळींचा ठराव मांडावा अशी मागणी विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात आली होती परंतु आधी सावरकरांना भारतरत्न द्या, आम्ही तुमच्यासह पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो असे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले. यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस होता. सावरकरांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भाजपने आज विधानसभेत सावरकर गौरव प्रस्ताव मंजुर करावा अशी मागणी भाजपकडून अध्यक्षांकडे करण्यात आली. तत्पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत भाजपची भूमिका मांडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुमोदन देत काँग्रेसच्या शिदोरी मासिकात सावरकरांबद्दल लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा उल्लेख करत शिदोरी मासिकावर बंदी आणण्याची मागणी केली.

महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांतील सावरकरांविषयीचे मतभेद आहेत त्यांची कल्पना असल्याने सरकारला कोंडीत पकडण्याची भाजपची रणनीति होती परंतु विधानसभा अध्यक्षांनी नियमांवर बोट ठेवून हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि पुढील कामकाज करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी संसदीय कामकाजमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. सावकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणीही नाकारत नाही, परंतु त्यांच्याबद्दलची प्रत्येक मते वेगळी असू शकतात.

व्यक्ती तितकी मते असतात. इतरांच्या मते आमच्यासारखेच असावे हा आग्रह चुकीचा आहे. सावरकरांची गायी आणि बैलाबद्दलची मते खूप वेगळी होती, ते प्रखर विज्ञानवादी होते. ती सर्वांनाच पटतात असे नाही. अर्थात त्यांच्या देशकार्याबद्दल आम्हाला आदरच आहे परंतु सावकरांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांना नेमका काय स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना सावरकरांना भारतरत्न का दिला गेला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेने नेते आणि संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी देखील भाजपवर निशाणा साधला. सावरकरांना भारतरत्न द्या. तुमच्यासह पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही स्वत: मांडू असे त्यांनी विरोधकांना सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे संतप्त भाजपच्या सदस्यांनी सभागृहात फलक फडकावत सरकारचा निषेध केला.