शिवसेना रोखणार PM मोदींचा ‘तो’ ड्रीम प्रोजेक्ट ? CMP मध्ये ‘फंडिंग’ थांबविण्याचा ‘उल्लेख’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात चर्चा सुरू आहे. तीनही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्रामवर विचार करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारने दिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये वापरली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. बुलेट ट्रेन योजनेत राज्य सरकारलाही निधी द्यावा लागणार आहे. बुलेट ट्रेनच्या निधीमध्ये महाराष्ट्राचा 25 टक्के खर्चाचा वाटा आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक मानला जातो. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई अशी धावेल. जपानच्या मदतीने ही ट्रेन तयार केली जात आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.

महापालिकेतही भाजप-शिवसेनेची लढाई
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना- भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम महापालिकेच्या युतीमध्येही दिसून येत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भाजप-शिवसेना ताब्यात आहे, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम या युतीवर होऊ शकतो.

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना महापौरपद सोडायला तयार नाही, तर 4 वर्षानंतर शिवसेना पदभार सोडेल आणि भाजप हे एक वर्ष हे पद ठेवेल, असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता.

शुक्रवारपर्यंत युतीची घोषणा होऊ शकते
दिल्लीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात सातत्याने बैठक होत आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे बैठक घेत आहेत, त्यानंतर दुपारी संयुक्त बैठक होणार आहे. यानंतर शुक्रवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवसेनेशी अंतिम चर्चा होईल.

शुक्रवारी महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन केले जाईल असा दावाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Visit : Policenama.com