‘हे सगळं पाहण्यासाठी आई हवी होती’, जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन होऊन इतक्या दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज मुहूर्त निघाला आहे. तब्बल ३४ दिवसानंतर होणाऱ्या या विस्तारात आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षातील एकूण ३६ नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार आहे. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह इतर १३ नेते शपथ घेणार आहेत. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक असणारे जितेंद्र आव्हाड यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. मंत्रिपद मिळणार असे समजताच ठाण्यात ‘एकनिष्ठेचे फळ’ असे लिहलेले बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले. यावेळी हे सगळं बघायला आई हवी होती अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.

‘आईचं दर्शन घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात होते. आज मंत्रिपदाची शपथ घेताना मला बघायला आई हवी होती. आमच्या घरची परिस्थिती अगदी बिकट होती. आई अशिक्षित असताना देखील मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवलं व कोणतीही खासगी शिकवणी न लावता तिने स्वत: घरी माझी शिकवणी घेतली, तर वेळप्रसंगी आईचं झाडूने मारलेलं आठवतंय’ असे सांगताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, मुंबईत विधानभवनसभेच्या मैदानात शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले असून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात येणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी, काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे देखील मुंबईत दाखल झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/