राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच ‘घोंगडं’ अद्यापही ‘भिजत’च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरु आहे. १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार अशी चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार टाळल्याची  माहिती समोर आली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स कायम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार राज्यातील अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही दिली होती. मात्र ह्या सर्व चर्चांना  पूर्णविराम मिळाला असून मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. लोकसभेत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आता शिवसेना- भाजप युतीनं विधानसभेसाठी  तयारी सुरू केली आहे. मात्र असे जरी असले तरीही मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धुसफूस चालू आहे. विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असल्यामुळे उद्याचा  मुहूर्त टळला तर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.