खाते वाटपाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना उलटल्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला. दरम्यान नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. नवनिर्वाचित मंत्र्यांमध्ये पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले आहे. आता त्याबाबतची माहिती उद्या किंवा परवा देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज 34 व्या दिवशी पार पडला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या एकूण 36 नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज खातेवाटप जाहीर करण्यात आले नाही. आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या तरुण मंत्र्यांचा समावेश आहे.

शपथविधीनंतर कॅबिनेटची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनिर्वाचित मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, नवनिर्वाचित मंत्र्यांमध्ये त्यांच्या पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले आहे. मात्र, त्याबाबतची माहिती उद्या किंवा परवा दिली जाईल.

संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने ते नाराज आहेत. तसेच त्यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने संजय राऊत देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. ते नाराज आहेत का असे विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारावेळी कुणी दिसले नाहीत, म्हणजे ते नाराज आहेत, असे म्हणता येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/