उध्दव ठाकरेंच्या शपथविधीला 400 बळीराजांना निमंत्रण, शिवाजी पार्कवर जय्यत तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरोधी महाविकास आघाडीने बाजी मारली आणि या सत्तामय नात्याचा अंत झाला. अखेर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार असून महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न होत असून या सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यासाठी उद्याचा दिवस खास ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी अनेक लोकांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे समोर आले असून उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील जवळपास ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितले होते की, “हे सरकार माझं सरकार असेल अन् सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार.” त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शेतकऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.

दरम्यान ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री आजवर झाला नसून जनतेच्या सांगण्यावरून आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या आग्रहावरून ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहणार असे सांगितलं जात आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे हे देखील ठाकरे घराण्याचेच वारस असून त्यांनाही उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील असे समजते. तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचसोबत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेत उद्याच्या शपथविधी दरम्यान कुठल्याही अडथळ्यास कुणाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली असून रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथक आदिसह चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडणार असून त्याचबरोबर अन्य काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथिगृहावर पार पडत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून या बैठकीत मंत्रिमंडळावर चर्चा करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. या शपथविधी सोहळ्याला शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर हजेरी लावणार आहेत आणि या सोहळ्याचा भाग होणार आहेत. अतिशय भव्यदिव्य आणि ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा पार पडेल असं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत असून त्यासाठी जय्यत तयारीला सर्वांनी सुरुवात देखील केली आहे.

Visit : Policenama.com