‘अजितदादा, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आजच महाविकासआघाडीच्या आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. उद्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अशात आता बारामतीत अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत असे बॅनर्स झळकताना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात राजकारणाचे अनेक रंग राज्याला पाहायला मिळाले. सर्व सत्ता संघर्षात अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपला साथ दिल्याच्या घटनेची खूप चर्चा झाली. या सगळ्यात अजित पवारांचं बंड खूप गाजलं.

अजित पवार पुन्हा पक्षात परतले आहेत. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय आहेत हेच यावरून समोर आलं आहे. परंतु अजित पवारांच्या बंडामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जरी तशी मागणी करत असले तरी सर्वकाही शरद पवारांवर अवलंबून आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

असं सगळं सुरू असताना बारामतीत अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. यावर अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो आहे. त्यावर मजकूर लिहिण्यात आलं आहे की, “दादा आपण राज्यात प्रथम क्रमांकाने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले, महाराष्ट्राला आपली गरज आहे, आपण थांबू शकत नाही, आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय.” यावर समस्त बारामतीकर असा उल्लेखही दिसत आहे. बॅनर्स नेमके कोणी लावले हे अद्याप समजलेलं नाही.

Visit : Policenama.com