आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीपूर्वी युती करणारे व निवडणुकीनंतर एकमेकांचे विरोधक बनलेले शिवसेना व भाजपा पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असल्याची टीका भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केली आहे. त्याचबरोबर आरेमधील आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यामागे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट केलं आहे की ‘सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत.’

आरेमधील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत, त्यांची यादी मुंबई पोलिसांनी द्यावी, मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यावरील गुन्हे मागे घेतलेत ते ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट पक्षाची माणसं आहेत. यामागे राजकारण काय आहे? असा प्रश्नही मोहित भारतीय यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश नुकताच दिला आहे. त्यानंतर नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करून नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

Visit : policenama.com