… तर ‘फ्लोअर टेस्ट’ आधीच CM देवेंद्र फडणवीस ‘राजीनामा’ देणार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – उद्या राजकीय घडामोडींना वेग येणार असून सगळ्यांचे लक्ष बहुमत कोण आणि कसे सिद्ध करणार याकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले असून भाजपास अजून एक दिवसाचा वेळ मिळाला आहे. तसेच विश्वासदर्शक ठरावावर खुल्या पद्धतीनं मतदान घेऊन त्याचं थेट प्रक्षेपण करण्याच्या स्पष्ट सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजता बहुमत चाचणी होणार असून भाजपाकडे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी आता केवळ ३० तास उरले आहेत.

त्यामुळे ‘देवेंद्र सरकार-2’ संकटात सापडल्याची चिन्ह सध्याला दिसत आहेत. सध्याची ही परिस्थिती बघता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचा नेता निवडून आला, तरच विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा, अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात देखील अशाच प्रकारे बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

एका रात्रीत डाव उलटला आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ही बातमी सकाळी सगळीकडे पसरल्यानंतर सगळ्यांनी तोंडात बोटे घातली होती. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नव्या सरकारला तातडीनं विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिलेअसून भाजपाला आता आमदारांची फोडाफोड करण्यासाठी फार कमी वेळ मिळणार आहे.

एका बाजूला भाजपाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्याचं मोठं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनं भाजपाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांची अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याचे समजते. तशी नोंददेखील विधिमंडळ सचिवालयात आहे असे दिसून. मात्र याबद्दलचा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांवर असल्यामुळे याबाबत निर्णय तेच घेतात. त्यामुळे अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपाचा अध्यक्ष असल्यास सकारात्मक घडामोडी या घडू शकतात.

भाजपा नेत्यांकडून विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकू असा ठाम विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांनी एकत्र येऊन आपापसांत चर्चा करत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आणि भाजपास आपल्या शक्तिप्रदर्शनाही चाहूल दिली आहे. या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्रदेखील महाविकासआघाडीकडून राज्यपालांना देण्यात आलं आहे. महाविकासआघाडीनं १६२ आमदार असल्याचा दावा केल्यानं भाजपा बहुमत कसं सिद्ध करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान भाजपा च्या नेत्यांकडून यावर सांगण्यात आले की कोणाकडे किती आमदार आहेत हे वेळेवर कळेलच.

Visit : Policenama.com