फडणवीसांच्या ‘सरप्राईज’पासून ‘सरेंडर’पर्यंत… महाराष्ट्रातील 80 तासांमधील 8 मोठे ‘घटनाक्रम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणं हे पूर्ण जगासाठी एक सरप्राईज होतं. 80 तासांपेक्षाही कमी काळ राहिलेल्या या सरकारचा शेवट हैराण करणारा नाही परंतु अपेक्षित होता. जेव्हा सुप्रीम कोर्टानं 30 तासांच्या आत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि त्याचं लाईव्ह प्रसारण करण्यासाठी आदेश दिले तेव्हाच याचा अंदाज आला होता. त्यामुळे काहीही तडजोड करण्याची भाजपची आशा मावळली होती. यानंतर फडणवीस सरकारच्या पडझडची उलटी गिनती सुरू झाली.

1) सकाळीच शपथविधी घेऊन झटका-
शनिवारी (दि 23 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता जेव्हा लोक नीट झोपेतून उठलेही नसतील तेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तसेच पदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. या अनपेक्षित घटनाक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार. त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. जेव्हा लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना विश्वास बसल नाही परंतु तोपर्यंत इतिहास झाला होता.

2) सुप्रीम कोर्टात रविवारी सुनावणी-
ही बातमी कळताच राष्ट्रवादी-शिवसेना आणि कॉंग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. शनिवारीच सर्व वृत्तपत्रात बातम्या झळकत होत्या की, उद्धव ठाकरे सीएम पदाची शपथ घेतील. यानंतर तिन्ही पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शनिवारीच या सरकारच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. ऐतिहासिक रुपात कोर्टात रविवारी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांनी आपापले युक्तिवाद न्यायालयात सादर केले आणि या खटल्याची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

3) ट्विटरवरून ज्युनियर पवारांची बॅटींग-
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ज्युनियर पवार म्हणजेच अजित पवारांनी मौन बाळगलं. रविवारी संध्याकाळी अचानक ते ट्विटरवर सक्रिय झाले. एकापाठोपाठ एक त्यांनी 22 ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्र्यांना शुभेच्छांबद्दल उत्तरं दिली. महाराष्ट्रात 5 वर्ष स्थिर सरकार देण्याचा शब्दही दिला. अजित पवार असंही म्हणाले की, ते राष्ट्रवादीतच आहेत आणि या पार्टीतच राहतील. पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार पाच वर्षे चालणार असून ते लोकांसाठी काम करेल.

4) शरद पवारांचा पावर प्ले-
अजित पवारांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली. लोकांनाही कळत नव्हतं की, राष्ट्रवादी भाजप सरकारचं समर्थन करत आहे की नाही. हा संभ्रम तेव्हा दूर झाला जेव्हा ट्विट करत पवार म्हणाले की, अजित पवार लोकांची दिशाभूल करत आहेत. भाजपसोबत जाण्याचा काही संबंधच नाही. राष्ट्रवादीनं एकमतानं काँग्रेस आण शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

5) सुप्रीम कोर्टात युक्तीवाद-
सोमवारी सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावर जोरदार युक्तीवाद झाला. न्यायमूर्ती एन व्ही रमण, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना हे या प्रकरणी सुनावणी करत होते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, हे घोडे बाजाराचे प्रकरण नाही, येथे संपूर्ण तबेलेच रिकामे आहेत. यावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पलटवार करत म्हटले की, “तबेले अजूनही आहेत, फक्त जॉकी म्हणजेच मुख्य घोडेस्वार पळून गेला आहे.” या याचिकेवर 80 मिनिट सुनावणी झाली. ती सदस्यांच्या खंडपीठानं म्हटलं की, यावरील निर्णय मंगळवारी सकाळी देण्यात येईल.

6) हयातमध्ये द ग्रेट MLA परेड-
महाराष्ट्राच्या गेममध्ये थ्रिलर तेव्हा आला जेव्हा मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आमदारांना एकत्र आणत 162 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा केला.

7) सर्वोच्च न्यायालयाचा शेवटचा झटका-
मंगळवारी कोर्टात सुनावणी सुरू असताना कोर्टनं सांगितलं की, फडणवीस सरकारनं 30 तासाच्या आत बहुत सिद्ध करावं. याशिवाय त्याचं लाईव्ह प्रसारणही करण्यात यावं. मतदान गुप्त राहणार नाही. यानंतर काही तासातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फडणवीसांसमोरचे सगळे रस्ते बंद झाले.

8) पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचा क्लायमॅक्स-
मंगळवारी (दि 26 नोव्हेंबर) दुपारी 3.30 वाजता देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजपला बहुमत दिले होते पण निकालानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलली. आम्ही अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाचे कधीच आश्वासन दिले नव्हते, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले होते की, मुख्यमंत्री भाजपचाच असेल.

आपल्या जागांची संख्या पाहत शिवसेनेने आपली भूमिका बदलली. आमच्याशी बोलण्याऐवजी ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी बोलले. आमच्याकडे बहुमत नाही आणि आम्ही राजीनामा देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला.

Visit : Policenama.com