केवळ ‘ताप’ मोजणं ही मोठी ‘चूक’, CM ठाकरेंनी सांगितलं ‘कोरोना’ प्रसाराचं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनानं शिरकाव करून अडीच महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. या काळात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात कोरोना कसा आला आणि कोरोनाग्रस्त रुग्णांना वेगळं करण्यात कोणत्या चुका झाल्या. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरीक्षणं नोंदवत भूमिका मांडली. तसेच कोरोना परिस्थिती हातळत असताना केंद्र आणि राज्यातील समन्वयाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं.

एका वेबसाईटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबसंवाद या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील परिस्थीतीची माहिती दिली आहे. तसेच कोरोनाचा शिरकाव होताना झालेल्या चुकांबद्दलही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी आढळला. पुण्यात हा रुग्ण आढळून आला. डॉक्टरांना वेगळी लक्षण दिसून आल्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समजलं. दुबईला 40 जणांचा ग्रुप फिरण्यासाठी गेला होता. त्यात हा रुग्ण होता, असे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाला असताना महाराष्ट्रातील नागरीक दुबईहून परतले. त्यावेळी त्यांची तपासणीच झाली नाही. कारण केंद्र सरकारनं केणत्या देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी याबद्दल एक यादी निश्चित केली होती. त्यामध्ये दुबई आणि युएई यांच नाव नव्हत. खरंतर याच ठिकाणाहून सर्वाधिक बाधित नागरिक भारतात आणि महाराष्ट्रात आले. सहाजिकच नंतर ते स्थानिक लोकांमध्ये मिसळून गेले आणि त्यातून कोरोना पसरत गेला.

यामध्ये एक मोठी चूक जी मला वाटते, ती म्हणजे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचं होणारं स्क्रिनिंग, केवळ ताप तपासणी करणं ही चूक आहे. काही प्रवासी ताप येतोय म्हणून औषध घेतात. त्यामुळे स्क्रिनिंग वेळी त्यांचा ताप नॉर्मल दिसून येतो. पण कोरोनाची लक्षणं त्यांच्यात तशीच राहतात. यामुळे त्यांची कोरोना चाचणी करणं आवश्यक होतं. जेणेकरून प्रसार थांबवता आला असता, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.