CM ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले – ‘विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही,असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला आहे. कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाला किती देते या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही त्याची काळजी करु नका. कोकण आणि शिवसेनेचे नाते घट्ट आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

तौक्ते चक्रवादाळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे कोकण दौऱ्यावर असून मालवणमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पंचनामे पूर्ण झाले असून याचा आढावा घेतल्यानंतर मदत जाहीर करु. केंद्राच्या निकषाप्रमाणे तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. पण एकूण आढावा घेतल्यानंतर आणखी काय करायचे असेल ते आम्ही करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे आम्हीदेखील पंतप्रधानांना मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचं कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील असून योग्य ती मदत करतील असा विश्वास आहे. तौक्तेची भीषणता गेल्या दोन दशकातील सर्वाधिक होती. वादळामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरुपी आराखडा जिल्ह्यांनी तयार केला असून तो जलदगतीने पूर्णत्वास नेणं गरजेेेचे आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी आणि निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यानी केली आहे. मोदींकडून गुजरातची पाहणी करुन जाहीर केलेल्या आर्थिक मदतीवर विचारले असता आपल्याला त्यात राजकारण आणायचे नाही, असे ठाकरे म्हणाले.