Pune News : कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : CM ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी (दि.21) आग लागली होती. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) दुपारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटियूटच्या मांजरी येथील इमारतीला आग लागली होती. बीसीजी लस तयार केली जाते त्या इमारतीला ही आग लागली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, सीरम इन्स्टिट्यूचे आदर पुनावाला, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आशेचा किरण असलेल्या लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. आग लागली तेथील दोन मजले वापरात होते. वरील ठिकाणी जिथं केंद्र सुरु होणार होतं त्या ठिकाणी आग लागली. मात्र, कोरोना लसीला कोणताही फटका बसलेला नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सखोल चौकशी करणार
सीरमध्ये लागलेल्या आगीची सखोल चौकशी करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. चौकशी अहवाल येत नाही तोवर निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सीरमचे सीईओ अदर पुनावाला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले. बीजीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रॉडक्ट्स् येणार होते त्यांच्या वरही प्रभाव पडल्याचे आदर पुनावाला यांनी सांगितले.