‘नाइट लाइफ’चा ‘अर्थ’ मौजमजा, छंद, पब आणि बार असा नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा नाईट लाईफ या ड्रीम प्रोजेक्टला मुंबईत सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेविरुद्ध भाजपा आता आवाज उठवत आहे आणि प्रचंड विरोध देखील भाजपाकडून केला जात आहे. या योजनेच्या नावाखाली मुंबईत चंगळवाद येणार अशी टीका भाजपाने केली आहे. दरम्यान या सगळ्या टीकांना सडकून उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ‘सामना’ ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांचा समाचार घेतला आहे.

या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरेंनी केंद्र-राज्य संबंध, राज्याचा विकास आणि नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट अशा काही विषयांवर त्यांनी आपले मत मांडले. तसेच नाईट लाईफ वर बोलताना ते म्हणाले की जे तुमच्या मनात आहे ते नाईट लाईफ मध्ये नाही अस अत्रे यांच्या शैलीत ते बोलले आणि भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला. तसेच ते म्हणाले की नाईट लाईफ मध्ये ‘लाईफ’ हा शब्द फार महत्वाचा असून जीवन… जे दिवसा चालतं तेच मुंबईत रात्री चालतं. मुंबई हे न झोपणारं शहर आहे… झोपत नाही तर मग रात्री करतं काय नेमकं ? तर कष्ट करत असतं. असे त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच ते म्हणाले नाईट लाईफचा अर्थ मौज मजा, पब आणि बार मध्ये जाणे असा नाही, तर मुंबईकर हा २४ तास जागा असतो. त्यात कष्टकरी वर्ग दिवसभर काम करून रात्री थोड्यावेळासाठी घरी जातो आणि कामानिमित्त त्याला थोडासा आराम करून बाहेर पडावे लागते. घरी गेल्यावर त्या वेळी कुटुंबासोबत तो बाहेर जाऊ शकत नाही कारण रात्रीच्या वेळी सर्व हॉटेल्स वगैरे बंद होतात. त्यामुळे दिवसभरात त्याचे तिकडे जाणे होत नाही त्यासाठी नाईट लाईफ महत्वाचे आहे. या अशा सर्व गोष्टी नाईट लाईफमध्ये येतात म्हणजेच मुंबई ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की विरोधी पक्षाचा हा निव्वळ गैरसमज आहे की, पोलीस रात्री झोपतात. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी पोलीस चोवीस तास जागाच असतो आणि त्यांना खरोखर मुजराच केला पाहिजे. पोलीस जागतात म्हणूनच आपण झोपतो. आपण झोपलो म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त संपतो आणि पोलीस घरी जाऊन झोपतो असे नाही. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि नाईट लाईफमुळे अनेक चांगले काम होत आहेत कारण मुंबईत रात्रपाळीवर अनेक लोक काम करत असतात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.