अजित पवारांनी मिळणार उपमुख्यमंत्री पद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (शुक्रवार) संध्याकाळी दीड तास चर्चा झाली. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

राज्यातील बहुचर्चीत सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांना एसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तसेच उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतेवेळी अजित पवार शपथ घेतील असे बोलले जात होते. मात्र, अजित पवार यांनी त्यावेळी शपथ घेतली नाही.
आता सिंचन घोटाळ्यात क्लिन चिट मिळाल्याने अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा असा आग्रह महाविकास आघाडीच्या आमदारांचा आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून कोणाला मंत्री करायचे याचा अद्याप घोळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठक झाली.

या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यसह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई छगन भुजबळ व नितीन राऊत या सहा मंत्र्यांचा २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाला.

Visit : Policenama.com