राज्यातील सत्तास्थापनेबाबत काँग्रेसने बनवली ‘रणनीती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले तरी अद्याप कोणीही सत्तास्थापन केली नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदावरून आडून बसली आहे. शिवसेना भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असताना सत्तेत समानवाटपावरून दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही. प्रसंगी राज्यात राष्ट्रपती राजवट करु असा इशारा भाजपने दिल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेबाबत चाचपणी सुरु केली आहे. तर भाजपने इतर पक्षातील आमदारांना फोडून सत्ता स्थापनेबाबत प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आम्ही देखील रणनीती बनवल्याचे सांगितले आहे. राज्यातील राजकीय स्थिती सोनिया गांधींना कळवण्यात आली असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच राष्ट्रपती राजवटीने कोणी घाबरून जाणार नाही. आमदार फुटतील अशी आम्हाला भीती नाही. आता कोणी फुटण्याचे धाडस करणार नाही आणि कोणी केलेच तर आम्ही सर्वजण मिळून त्याचा पराभव करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

निकालानंतर भाजपने सत्तास्थापन करायला हवे होते. मात्र, आता तसे होताना दिसत नाही. कारण भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, याला भाजपच जबाबदार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. जर भाजपने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाल्यास तो सरकारचा पराभव समजला जातो असे सांगत विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून थोरातांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे.

Visit : Policenama.com