‘महाराष्ट्राची बदनामी करणारे केंद्रातील ‘हे’ 6 मंत्री काय कामाचे? काँग्रेसचा ट्विट करत सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिकट होत आहे. राज्यात कोरोना लसींचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता जाणवत आहे. यांसह विविध मुद्यांवरून महाराष्ट्रातून मोदी सरकारमध्ये मंत्री झालेल्यांवर काँग्रेसने ट्विट करत टीका केली. ‘दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?’, असा सवाल उपस्थित केला.

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा महाराष्ट्राला केला तर परवाना रद्द करण्याची धमकी केंद्र सरकारने निर्यातदारांना दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच आता काँग्रेसनेही टीका केली आहे. त्यामध्ये ट्विट करून म्हटले, की ‘ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असे उत्तर देण्यात येते, रेमडेसिव्हिर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?’

दरम्यान, काँग्रेसने हे ट्विट करताना त्यामध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या मंत्र्यांचे फोटोही ट्विटमध्ये दिले आहेत. या मंत्र्यांना उद्देशून काँग्रेसने ट्विट करत निशाणा साधला आहे.