… म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँग्रेस ‘नाराज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमडळ विस्तार येत्या 30 डिसेंबरला होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती. मात्र, काँग्रेस अद्यापही नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या वाट्याला जी मंत्रिपदं आली आहेत त्यात अदलाबदल काँग्रेसला हवी असून काही महत्त्वाची खाती काँग्रेसला पाहिजेत.

शिवसेनेने आपल्याकडे असलेली काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला दिली त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसलाही काही महत्त्वाची खाती द्यावीत अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे 28 डिसेंबरला मुंबईत येणार असून त्यानंतर तीनही पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाची खाती काँग्रेसला देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून या बैठकित हा मुद्दा काँग्रेस उपस्थित करण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

काँग्रेसला गृहनिर्माण, सहकार, उद्योग, कृषी, ग्रामीण विकास या महत्त्वाच्या खात्यापैकी दोन खाती हवी आहेत. त्यामुळे काँग्रेसने दबाव आणला आहे. आता हा दबाव किती काम करतो हे 28 तारखेच्या बैठकिनंतरच समजेल. आपल्याकडे जी खाती आली आहेत त्यामुळे जनतेशी थेट संपर्क करता येत नाही. पक्षाची प्रतिमा सुधारणं आणि पक्ष विस्तार करणं यासाठी नव्या खात्याची काँग्रेसची मागणी आहे. नवी खाती पदरात पाडून घेण्याची हीच ती वेळ असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे शक्य नसल्याने काँग्रेसकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/