देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांचा मुलगा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. लोकप्रतिनिधी अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्याने आणि त्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

अभिमन्यु पवार यांनी स्वत: ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झालं आहे.अभिमन्यु पवार यांनी ट्विट करून माहिती देताना म्हटले आहे की, मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत, अशी माहिती पवार यांनी ट्विट करून दिली आहे.

तसेच, लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. एक नम्र विनंती आहे, मागच्या 4-5 दिवसांत माझ्या व परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घ्यावे आणि खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी, अशी विनंतीही पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.