बीडमधील धक्कादायक घटना ! ‘ते’ दोघे आणि 2000 जण क्वारंटाइन ?

परळी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील एसबीआय बँकेच्या 8 कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परळीकरांची चिंता अधिक वाढली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीमध्ये सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाने सात ते आठ दिवसांपूर्वी शहरातील एका ऑफिसमध्ये तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने गुत्तेदार नेत्याच्या शेतात त्याच्या वाढदिवसाच्या मेजवानीमध्ये सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान आरोग्य विभागाने परळी शहर आणि परिसरातील 2000 पेक्षा अधिक लोकांना तातडीने क्वारंटाइन केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

परळी शहरातील एसबीआय बँकेच्या शाखेत काम करणाऱ्या 8 कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परळी शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. तर आसपासच्या दत्तक असलेल्या 15 गावात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी दोन जण वेगवेगळ्या पार्टीत हजर होते. यातील एका पार्टी खासगी कार्यालयात झाली. त्या ठिकाणी 10 ते 12 जण हजर होते. यामध्ये एका कॉलेजच्या प्राचार्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी हजर होते.

तर दुसरी पार्टी एका गुत्तेदार नेत्याच्या शेतात त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली होती. या पार्टीला मोठ्या प्रमाणात लोकं हजर होती. यामध्ये नेते, कार्यकर्ते, अधिकारी, दिग्गज व्यापारी यांनी या पार्टीला हजेरी लावली असल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य विभागाने या सर्वांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून बँकेशी संबंधित दोन हजार पेक्षा अधिक लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.