Coroanvirus : राज्यात ‘कोरोना’च्या टेस्टची ‘फीस’ आता ‘फिक्स’, लॅबमध्ये 2200 तर घरातून केलेली तपासणी 2800 रूपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी फिक्स रेट केला आहे. आता महाराष्ट्रात खासगी लॅबमध्ये 2200 रुपयांत कोरोनाची टेस्ट केली जाऊ शकते. जर तुम्हाला लॅबमधील व्यक्ती घरी येऊन तुमचा स्वॅब घेऊन गेला तर त्यासाठी 2800 रुपये मोजावे लागतील. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी 4500 रुपये इतके होते, आता ते 2200 रुपये केले आहे. कमीत कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असेही टोपे यांनी म्हटले आहे.

व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पीटलमधून स्वॅब घेतल्यास 2200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2800 रुपेय शुल्क घेतले जाणार आहे. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब 4500 रुपये शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 5200 रुपये शुल्क आकारले जात होते, असे राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, आयसीएमआरने 25 मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चित करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटकने कोरोना चाचणीसाठी 2250 रुपये निश्चित केले तर तामिळनाडूने 2500 रुपये व जम्मू काश्मीरमध्ये 2700 रुपये दर निश्चित करण्यात आला.

आयसीएमआरनं सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता. या समितीनं कोरोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भात अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता.