Beed : प्रेरणादायी ! ना नफा ना तोटा धर्तीवर चौघा मित्रांनी उभारले कोविड सेंटर, रुग्णांसाठी ठरतेय वरदान

बीड : पोलीसनामा ऑनलाइऩ –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी लोक मदतीसाठी धावपळ करताना दिसून येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील 4 मित्रांनी सरकारी मदतीची वाट न पाहता तब्बल 30 लाख खर्चून 50 बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. ना नफा ना तोटा या संकल्पनेवर हे सेंटर उभारले असून रुग्णांकडून सरकारी हॉस्पिटलपेक्षा कमी शुक्ल आकारले जात आहे. त्यामुळे रुग्णांसाठी हे कोविड सेंटर वरदान ठरत आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर येथे आयडिएल इंग्लिश स्कूलमध्ये हे कोविड सेंटर उभारले आहे . प्रकाश देसारडा, डॉ. भगवान सानप, डॉ. गणेश देशपांडे आणि अभिजीत डुंगरवाल या चौघांनी एकत्र येऊन हे सेंटर उभारले आहे. कोविड सेंटरमध्ये 12 ऑक्सिजन बेड्स आणि 38 जनरल बेड्सची व्यवस्था आहे. येथे रुग्णाला 3 वेळेच जेवण पुरवले जाते. देशात कोरोनाचे संकट आहे. अशावेळी सरकारसोबत आपणही मदतीसाठी पुढे आले पाहिजे या विचारातून स्वखर्चाने आम्ही कोविड सेंटर उभारल्याचे अभिजीत डुंगरवाल म्हणाले. प्रकाश देसारडा म्हणाले की, कोविड सेंटरमध्ये 10 डॉक्टर आणि 40 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. 18 एप्रिलपासून आतापर्यंत 150 हून अधिक लोकांवर याठिकाणी उपचार करून घरी सोडले आहेत. सध्याच्या 37 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचसोबत पर्यायी ऑक्सिजन आणि औषधांचा साठाही उपलब्ध आहे. संक्रमित रुग्णाच्या निधनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही सेंटरने उचलली आहे. परंतु दिलासादायक म्हणजे आतापर्यंत या सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्यांपैकी एकही रुग्ण दगावला नसल्याचे ते म्हणाले.