Coronavirus in Maharashtra : कोरोना संकटात मोठा दिलासा ! राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेटही अधिक (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना स्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. मागच्या दोन आठवड्यांशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण

राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. तर इतर 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या अद्यापही कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्ण संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे. पूर्वी पॉझिटिव्हिटी रेट 27 टक्के होता. आता तो 22 टक्क्यांवर आला आहे.

दोन-तीन दिवस पुरेल एवढा लसींचा साठा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना आता लस दिली जात आहे. मात्र लस उपलब्ध होत नव्हती. परंतु आता कोविशिल्ड लसीचे आज 9 लाख डोस उपलब्ध होतील. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढा लसींचा साठा आहे. आवश्यक आहे तितक्या लसींचा पुरवठा केंद्राकडून होत नसल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांचे पूर्ण लसीकरण होईल

कोविशिल्ड 13 लाख आणि कोवॅक्सिन 4 लाख डोसची ऑर्डर राज्य सरकारने दिलीआहे. लवकरच लसीचे डोस उपलब्ध होतील आणि राज्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. तरुणांनी नाव नोंदणी केल्याशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले. स्पुटनिक लसही लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रेमडेसिवीरची केंद्राकडे मागणी

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर उपयुक्त आहे. त्यामुळे या इंजेक्शनला खूप मागणी आहे. मात्र, मागणी करुन देखील केंद्राकडून पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा या जिल्ह्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कडक लॉकडाऊन करावा लागला आहे. केंद्राकडे अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी केली आहे. केंद्राने ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे

–  गेल्या काही दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

–  12 जिल्ह्यात मोठी घट

–  24 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी करण्यावर भर

–  राज्यात टेस्ट कमी केल्या नाहीत, अडीच लाख टेस्ट करत आहे

–  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

–  रिकव्हरी रेट 84.7 टक्के आणि देशाचा 81 टक्के आहे.

–  दररोज 40 हजार रेमडेसिवीर मिळतात

–  रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे, आज तीन लाखांच्या आसपास रेमडेसिवीर उपलब्ध होतील

–  ओडिशामधून ऑक्सिजन येत आहे. वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झाला पाहिजे