Coronavirus : ‘लॉकडाऊन’ असतानाही 7 जण गेले पोहायला, पोलिसांना म्हणाले उघड्या अंगावर नका…(व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून आत्तापर्यंत 700 पेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असून महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 130 वर पोहचली आहे. देशात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाल आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. नागरिकांना वारंवार आव्हान करण्यात येत आहे. मात्र नागरिकांमध्ये अद्याप याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. दुकानांसमोर गर्दी करताना दिसत आहेत.

लोकांनी आपल्या घरात रहावे यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. याचाही परिणाम नागरिकांवर झालेला नाही. नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. देशभरातील अनेक शहरांमध्ये पोलिसांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं या फिरणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. कधी उठबशा काढायला लावून तर कधी भर रस्त्यात आपल्या दांडुक्यानं प्रसाद देऊन तर काही ठिकाणी स्पिकरवरून नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडीयावर पोलिसांकडून होत असलेले व्हिडिओ व्हायरल होत असताना असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण सरकार आणि पोलिसांचे सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे विहिरीत पोहायला गेले आहेत. सरकार वारंवार घरात बसा असं सांगत असतानाही जीव धोक्यात घालून हे सर्वजण मजा करत होते. याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पोहण्याचा आनंद घेणाऱ्या तरुणांना विहिरीतून बाहेर बोलावून त्यांना लाठीचा चांगला प्रसाद दिला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण विहिरीत एकत्र पोहाण्यासाठी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारनं घरात बसण्यास सांगितलं असताना हे तरूण अशा पद्धतीने गावच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले. विहिरीत मजा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी काठीने प्रसाद देऊन घरी पाठवले. या तरुणांसोबत काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे.