Coronavirus : राज्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85 टक्क्यांवर, मृत्यू संख्या मात्र वाढलेलीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. ही वाढ कायम असून आता कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 85.65 टक्क्यांवर पोहचले आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र घट होताना दिसत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी दिवसभरात 14 हजार 238 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाख 58 हजार 606 एवढी झाली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे. राज्यात दिवसभरात 10 हजार 259 नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर 250 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.66 टक्के इतके आहे. तर मृत्यूचं प्रमाण 2.65 एवढं झालं आहे.

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 80 लाख 69 हजार 100 चाचण्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 म्हणजेच 19.66 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 85 हजार 270 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत 41 हजार 965 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.