Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात ‘विक्रमी’ 24619 नवे पॉझिटिव्ह तर 398 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासामध्ये उच्चांकी 24 हजार 619 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 लाख 45 हजार 840 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 20.44 टक्के इतके आहे. याच दरम्यान कोरोनामुळे 398 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 31 हजार 351 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनामुले मृत्यू होण्याचा मृत्यूदर 2.74 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 8 लाख 12 हजार 354 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.90 टक्के इतके आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

सध्या राज्यामध्ये 3 लाख 01 हजार 752 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आजच्या घडीला 17 लाख 70 हजार 890 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 36 हजार 827 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 56 लाख 4 हजार 890 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 11 लाख 45 हजार 840 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर इतरांचा निगेटिव्ह आला आहे.