Coronavirus : दिल्लीत नव्हे तर ‘आर्थिक’ राजधानी मुंबईत ‘कोरोना’चा वाढता धोका, ही आहेत कारणं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या अधिक होत असल्याने कोरोना बाधित रुग्ण अधिक सापडत आहेत. असा दावा केला जात होता. मात्र, आता कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण महाराष्ट्रातच सर्वाधिक असल्याचं उघड झालं आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. परंतु एक गंभीर बाब समोर आली आहे. आयसीएमआरच्या सूत्रांनुसार कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही महाराष्ट्रात जास्त आहे. एकूण चाचणी केलेल्या सँपल्सपैकी 31.76 टक्के रुग्णांचे सँपल्स कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. चाचण्या जास्त करतो, असा दावा करणाऱ्या महाराष्ट्रात चाचण्यांची संख्या सर्वाधिक नसून तामिळनाडूमध्ये सर्वाधिक चाचण्या होत आहेत.

आयसीएमआरच्या नोंदीनुसार 21 जूनच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात 7 लाख 70 हजार 711 कोरोना चाचण्या झाल्या. तर तामिळनाडूत सर्वाधिक 7 लाख 71 हजार 263 चाचण्या झाल्या आहेत. पण रुग्ण पॉझिटिव्ह यायचं प्रमाण मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात चाचणी केलेल्या 100 रुग्णांपैकी 31.76 टक्के लोकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. त्यामुळे दररोज कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

मुंबई महानगर आणि पुणे परिसरात या दोन कोरोना हॉटस्पॉटमुळे महाराष्ट्राचा कोरोना आलेख वाढत चालला आहे. अनलॉकनंतर कोरोना रुग्णांच प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्या प्रमाणात चाचण्या वाढवलेल्या नाहीत. हे वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रेटवरून दिसून येत आहे. मुंबईत दररोज किमान हजारावर नवे रुग्ण आढळून येत आहेत. 21 जूनला पुणे शहरात कहर झाला. 21 जूनला पुण्यात 675 रुग्ण आढळून आले.

दिल्ली सरकारने कोव्हिड चाचण्याची संख्या तिपटीने वाढवली आहे. आता दिल्लीच्या कुठल्याही नागरिकाला कोरोनाची चाचणी करून घेयला अडचण येणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी सोमवारी केला. सुरुवातीला दररोज 5 हजार टेस्ट केल्या जात होत्या. आता तीच संख्या दररोज 18 हजार एवढी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सरासरी 15 हजार चाचण्या होत असल्याचं आयसीएमआर च्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

तामिळनाडूत महाराष्ट्रापेक्षा अधिक चाचण्या होऊन देखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दरही देशाच्या तुलनेत खालावलेला आहे. आतापर्यंत देशात 55.80 टक्के लोक बरे झाले आहेत तर महाराष्ट्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.78 टक्के आहे. मृत्यू दर देखील गुजरातच्याखालोखाल महाराष्ट्राचा अधिक आहे. महाराष्ट्रात मृत्यू दर 4.67 टक्के आहे.

चाचणी रिझल्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण

महाराष्ट्रात – 31.76 टक्के
दिल्ली – 22.29 टक्के
तामिळनाडू – 16.29 टक्के
ICMR च्या नोंदीनुसार 21 जूनपर्यंतच्या चाचण्या
तामिळनाडू – 7 लाख 71 हजार 263
महाराष्ट्र – 7 लाख 70 हजार 711
यामध्ये दिल्लीचा 8 वा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात किती चाचण्या होतात ?
19 मे – 3,04,446
3 जून – 5,05,564
13 जून – 6,49,092
21 जून – 7,70,711