चिंताजनक ! ‘कोरोना’मुळं ऊसतोड मजुरांच्या तब्बल 28000 मुलांवर उपासमारीची वेळ, दुपारचं जेवण बंद झालं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील 28 हजार ऊसतोड मजूर मुलावर उपासमारीची वेळ आली आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली. कोरोना व्हायरसमुळे शाळा, वसतिगृह, हंगामी वसतिगृह बंद केल्याचा सर्वात मोठा फटका ऊसतोड मजुरांच्या मुलांना बसला आहे. शासन कोरोनाच्या उपाय योजनेसाठी आग्रही असताना दुरीकडे या मुलावर उपासमारीची वेळ आली आहे. या बाबतीत शासनाने तत्काळ उपाय योजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांची उमासमर थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

वडवणी तालुक्यातील कान्होबाचीवाडी या गावातील 80 टक्के लोक उसतोडणीला गेले आहेत. या गावात 50 मुले ही प्राथमिक शिक्षण घेतात. 15 मार्चपासून शाळा बंद केल्याने या गावातील ऊसतोड मजूर मुलांसाठीचे हंगामी वसतिगृह बंद झाल्याने या गावातील 35 मुलांच्या खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावात फक्त वयोवृद्ध माणसे आहेत. शाळा बंद केल्यामुळे या मुलांना सांभाळायचे कसे असा सवाल 65 वर्षाच्या सुशीला बाई गाडे यांनी केला आहे.

अशीच परिस्थिती विनायकराव गाडे यांची पाच नातवंडे असून मुलांना जेवण तयार करून खाऊ घालणे अडचणीचे ठरत आहे. वडवणी तालुक्यातील खडकी देवळा, केज तालुक्यतील जिवाचीवाडी, शिरूर तालुक्यतील लोणी वारनी बीड तालुक्यतील पिंपळनेर, उमरद खालसा,या गावातील वसतिगृह बंद करण्यात आली आहे. शाळा बंद झाल्याने घरीच राहावे लागत आहे. अजूनही आई वडील आले नाहीत. त्यामुळे दुपारचे जेवण मिळत नाही, असे एका विदयार्थ्याने सांगितले आहे.

बीड जिल्हयातून पाच लाख ऊसतोड मजूर हे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसतोडणीला जातात. त्यांच्या मुलांसाठी जिल्हापरिषद शाळेत असतात. हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात आली आहेत. बीड जिल्हयात या वर्षी 550 वसतिगृहामध्ये तब्बल 28 हजार मुले होती. मात्र कोरोनाव्हायरसमुळे शासनाने 15 तारखे पासून बंद करण्यात आली आहेत. अद्याप ऊसतोड मजूर गावी आले नाहीत. या मुलांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत पालक येणार नाहीत तोपर्यंत ही वसतिगृह सुरू ठेवावीत आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून उपासमार थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.