Coronavirus : ‘क्वारंटाईन’ सेंटरमध्ये जेवण द्यायचा मनपाचा कर्मचारी, झाला संक्रमित अन् निवृत्तीच्या दिवशी गेला बळी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शनिवारी 2940 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आणि 99 लोक मरण पावले. मृतांमध्ये 62 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 65168 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा 2197 इतका झाला आहे.

सेवानिवृत्तीच्या दिवशीच झाला मृत्यू

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भाईंदर पाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्यांना जेवण देण्यासाठी ड्यूटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा शनिवारी सेवानिवृत्तीच्या दिवशी मृत्यू झाला. या कर्मचार्‍याला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि 18 मे पासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवार या कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा दिवस होता आणि त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दुसर्‍या एका घटनेत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या एका पाच दिवसांच्या मुलीमध्ये शनिवारी संसर्गाची पुष्टी झाली.

क्वारंटाईन केंद्रामध्ये केली आत्महत्या

त्याचवेळी महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील क्वारंटाईन केंद्रामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील संस्थागत क्वारंटाईन केंद्राची आहे. या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळली. शनिवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘चंद्रपूर शहरातील श्यामनगर भागातील एका 30 वर्षीय व्यक्तीने महाविद्यालयाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते नागपूरहून चंद्रपुरात आले होते आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना महाविद्यालयात क्वारंटाईनमध्ये ठेवले होते.’ आत्महत्या करण्यामागील कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.