मागील वर्षाचा वाईट अनुभव गाठीशी असतानाही…; रोहित पवारांची केंद्रावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. बाधितांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच अनेक वैद्यकीय सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यानंतर आता या सर्व परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहित सरकारच्या धोरण आणि निर्णयावर टीका केली.

रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘कोरोनाचे नवनवे स्ट्रेन्स तसेच जगभरातील कोरोनाच्या लाटा बघता हा विषाणू अजून बरेच दिवस जगाला खेळवणार, हे निश्चित आहे. यामध्ये आपल्या नागरिकांचे संरक्षण करून कमीत कमी नुकसान होईल, यासाठी आपल्याला दक्षता घ्यावी लागेल. टेस्टिंग तर आपण मोठ्या प्रमाणात वाढवली आहेच, परंतु टेस्टिंग सोबतच योग्य उपचार पद्धती, Genome sequencing, लसीकरण आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागेल.
जगभरात ज्या देशांमध्ये लसीकरण काटेकोरपणे राबवलं गेलं तिथं रुग्णांची संख्या कमी झाली असून, या देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी पहायला मिळतोय. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपैकी 48.2%, अमेरिकेत 38.2% तर जर्मनीमध्ये 18.9% लोकांचे लसीकरण झाले. इस्राईलनेही लसीकरणात आघाडी घेतली असून, आता तर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची अटही त्यांनी काढून टाकलीय, असे त्यांनी लिहिले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1176675162796224&id=220852055045211

तसेच आपल्या देशात केवळ 10.96 कोटी लोकांना पहिला डोस तर 1.70 कोटी लोकांना दुसरा डोस असे एकूण 138 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 12.66 कोटी डोस पूर्ण केले आहेत. 5 एप्रिल रोजी आपण सर्वाधिक म्हणजे 45 लाख लोकांचे लसीकरण केले होते. नंतरच्या काळात मात्र आपण लसीकरणाचा वेग वाढवू शकलो तर नाहीच मात्र तो मंदावला ही वस्तुस्थिती आहे. 18 एप्रिल रोजी आपण केवळ 10 लाख लोकांचं लसीकरण केलं, यावरून लसींचा तुटवडा किती आहे याचा अंदाज येतो.

जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता ही अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतातही दुसरी लाट येणार हे सर्वश्रुत होते. त्यामुळे मागील एक वर्षात आपण जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे होते. राज्यांनी लसीकरणाची क्षमताही वाढवली. मात्र, लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद झाली.

याशिवाय पुरेसा वेळ व मागील वर्षाचा वाईट अनुभव गाठीशी असतानाही भारतात लसीचा तुटवडा निर्माण होणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळं आपलं लसीकरणाचं धोरण चुकलं का? लसींची मागणी आणि पुरवठा याचा अंदाज केंद्र सरकारला आला नाही की कोरोनावर मात केल्याच्या अविर्भावात केंद्र सरकारने लसीकरणाकडं दुर्लक्ष केलं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले,’ असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.