140 नंबरवरून येणारा कॉल उचलू नका ? पोलिसांनी सांगितली वस्तूस्थिती, जाणून घ्या ‘त्या’ नंबरचं सत्य ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गेल्या काही दिवसांपासून “मुंबई पोलिसांचा संदेश आहे, १४० क्रमांकावरुन सुरु होणारे फोन घेऊ नका, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होईल” अशा फॉरवर्ड मेसेजने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पण, या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तथ्य नसून तुमचे बँक खाते किंवा डेबिट/क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती इतरांना दिल्याशिवाय तुमच्या बँक खात्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान नसल्याचं, महाराष्ट्र सायबर सेलने स्पष्ट केलं आहे.

१४० या नंबरवरुन येणारे फोन हे टेलिमार्केटिंगचे कॉल्स असू शकतात, असं सायबर सेलकडून सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं की, १४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरुन आलेला फोन कॉल उचलल्यावर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते” असा इशारा देण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा व्हिडीओ कोठून आला हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, या व्हिडीओने टेलिमाकेर्टिंग फोन वर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहिरात असून या अफवेवरती विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी तातडीने केले. १४० आकड्यापासून सुरु होणाऱ्या क्रमांकावरचे आलेले फोन उचलल्यास बँक खात्यातील सर्व रक्कम काढली जाईल, असे या घोषणेत सांगितलं जात आहे.

काय आहे सत्य?

एका खाजगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रीकरण असल्याचं सांगण्यात आलं. परंतु, तशा प्रकारचा कोणताही खुलासा यात केलं नसल्याने खरेखुरे पोलिसच या सूचना करत असल्याचे नागरिकांना वाटले आणि चांगलाच गोंधळ उडाला. हा व्हिडीओ सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर ही अफवा असल्याची माहिती दिली गेली. तरी सुद्धा नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलने तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार ताबडतोब थांबवण्याची सूचना केली आहे.