भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतकांचा आकडा 13 वर पोहोचला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोमवारी पहाटे भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढून 13 झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन वर्षाचा मुलगा देखील होता, तर चार वर्षांच्या मुलासह 13 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडी हे ठाणेपासून दहा किमी अंतरावर असलेले पॉवरलूम शहर आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की या इमारतीत 40 फ्लॅट होते आणि सुमारे 150 लोक या इमारतीत राहत होते.

धामणकर नाक्याजवळील नरपोली येथील पटेल कंपाऊंडस्थित इमारत जेव्हा कोसळली तेव्हा तेथील रहिवासी झोपले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) चे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले की, दल ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचा उपयोग करीत आहे. मदत व बचावकार्य अद्याप सुरू आहे. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतांच्या कुटूंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली.

परिसरात वीजपुरवठा खंडित केला

ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की इमारतीचा एक भाग कोसळला आणि इमारतीत राहणारे बरेच लोक ढिगाऱ्यात अडकले. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या जीर्ण इमारतींच्या यादीमध्ये या इमारतीचा समावेश नसल्याचे ते म्हणाले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की इमारत कोसळल्यानंतर लगेच रहिवासी घटनास्थळी पोहचले आणि लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास मदत केली. अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारी म्हणून या भागात वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इमारत कोसळल्याची चौकशी केली जाईल

भिवंडीचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले की, इमारत कोसळल्यानंतर नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून इमारतीचे मालक सय्यद अहमद जिलानीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 337,338, 304 (2) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इमारत कोसळल्याची चौकशी केली जाईल. त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. ते म्हणाले की भिवंडीतील 102 धोकादायक इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like