‘चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट’ : अजित पवार

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडला लागून असलेल्या पुणे शहरात घडलेल्या प्रकरणावर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पळपुटे पोलीस (police) समाजाला नको आहे, तर पोलिसांना पाहून चोरटे पळणारे स्मार्ट पोलीस हवे आहेत. चोरांना पाहून पोलिसांनी धूम ठोकल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत याचा परिणाम इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर होतो. अशा घटनांमुळे मनोबल घटतं, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे, आमदार सुनिल शेळके, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट वॉच, स्पोर्ट सायकल वाटप आणि ग्राम सेवा योजनेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. परंतु याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली. चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्ही मधून उघडकीस आली. चोर आले म्हणून पोलिसच पळून जातात ही केविलवाणी गोष्ट आहे. त्या पोलिसांवर कारवाई केली. मात्र, अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते.

वरिष्ठांनी लक्ष द्यावे
पुण्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत यामुळे पोलिसांच्या मनोबलावर वाईट परिणाम होतो. याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे अशी ताकीद त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी दिली. पोलिसांनी कोरोना काळात जोखीम पत्कारुन केलेल्या कामाला तोड नाही. ते कर्तव्य पार पाडत असताना पोलीस बांधवांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात घेतली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

मी तुमच्यासोबत आहे
शहरात होत असलेल्या वाहनांच्या तोडफीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, तोडफोडीच्या घटनांमध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष आहे ? गुंडांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सांगतो की, तो कोणत्या पक्षाचा, गटाचा याचा विचार न करता महाविकास आघाडचे सरकार असले तरी गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे. अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणी फोन केला तर मला सांगा. मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.