भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना संशयित ‘लिफाफा’ पाठविल्याप्रकरणी महाराष्ट्रातील डॉक्टरला अटक

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेशतील दहशतवादविरोधी पथकानं भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकुरला संशयास्पद लिफाफे पाठवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी आजच (शनिवार, दि 18 जानेवारी) या प्रकरणी माहिती दिली आहे.

नांदेडमधील इटवारा पोलीस ठाण्यातील अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी सांगितलं की, “तपासादरम्यान मध्य प्रदेश एटीएसला आढळून आलं की, नांदेड जिल्ह्यातील धनेगाव भागातील डॉक्टर सय्यद अब्दुल रहमान खान (35) नं संशयित लिफाफे ठाकुर यांना पाठवले होते. रहमान क्लिनीक चालवतो.”

पुढे ते म्हणाले, “मध्य प्रदेश एटीएसनं रहमान खानला गुरुवारी ताब्यात घेतलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता. कारण त्यानं पूर्वीही काही अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. यात त्यानं दावा केला होता की, त्याच्या आई आणि भावाचा दहशतवाद्यांशी संपर्क आहे आणि त्यांना अटक केली जावी. अशी पत्र लिहल्या प्रकरणी त्याला पूर्वीही अटक झाली आहे.

लिफाफ्यात विषारी रासायनिक पदार्थ
खासदार प्रज्ञा ठाकुर यांनी सोमवारी भोपाळ पोलिसात तक्रार दाखल केली होती की, त्यांना कोणीतरी काही लिफाफे पाठवले आहेत ज्यात विषारी रासायनिक पदार्थ आहे. पोलिसांना ठाकुर यांच्या निवासस्थानी तीन ते चार लिफाफे आढळून आले ज्या उर्दूमध्ये काही लिहिले होते.

पूर्वीही डॉक्टरला झाली होती अटक
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “पोलिसांचं त्याच्या मोबाईल फोनवरून त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवून होते. परंतु तो मोबाईल फोन घरीच ठेवायचा आणि ही पत्रे टाकण्यासाठी औरंगाबाद, नागपूर आणि इतर ठिकाणी जायचा. रहमानचा आपल्या भावाशीही वाद झाला होता. भावाला मारहाण केल्याप्रकरणी त्याला पूर्वीही अटक झाली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/