राज्याला कर्तबगार CM हवा आहे, Driver नको, भाजप नेते नारायण राणे यांची बोचरी टीका

सिंधुदुर्ग: पोलीसनामा ऑनलाईन – आपण मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रसिध्द झालेल्या सामनाच्या मुलाखतीत सांगितले. पण महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवा आहे. ड्रायव्हर नकोय, अशा बोच-या शब्दात भाजप खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (CM Uddhav Thackeray) वार केला. ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला म्हणून महाराष्ट्र अधोगतीकडे जात आहे, असा मुख्यमंत्री राज्याने कधी पाहिला नाही, अनुभवला नाही, अशी टीकाही राणे यांनी केली.

नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि. 27) एका वृत्तवाहिनीशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सामनातील मुलाखतीत ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. मुख्यमंत्री आता शिवसैनिकांना भेटणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे एक वर्ष झाले आमदार आणि मंत्र्यांनाच भेटले नाहीत. जनतेला तर त्यांचे दर्शनही झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. यावेळी राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही लक्ष्य केले. राऊत यांना काहीतरी पदरात पाडून घ्यायचे आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांची सारखी मुलाखत घेतात आणि उत्तरही स्वत:च देतात, अशी खोचक टिप्पणी राणे यांनी केली.

तुम्ही ड्रायव्हिंग का करताय ?, उद्धव ठाकरे म्हणाले..
माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती दडपून ठेवायचे, किती बंधन ठेवायची. मग प्रत्येकवेळी त्यांची कोरोना टेस्ट करा. तर हा त्रास नको म्हणून मी ती सुरुवात केली आणि आता ड्रायव्हिंग सुरूच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत म्हटले आहे. मी गाडी चालवतच राहीन. ठीक आहे, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत गाडीत नुसता बसून प्रवास करेन.

मुख्यमंत्रिपद त्याची प्रभावळ काही जण मानतात, पण तसे काही नाहीच. मुख्यमंत्रीसुद्धा माणूसच असतो. पंतप्रधानही माणूसच असतो. फक्त आपल्यातली माणुसकी कुणी घालवू नये. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यातली, पंतप्रधानातली माणुसकी मरेल त्या दिवशी तो पंतप्रधान किंवा तो मुख्यमंत्री कामाचा नाही. पाय जमिनीवर आहेत, क्लचवर आहेत, ब्रेकवर आहेत आणि एक्सिलेटरवरही आहेत आणि हातात स्टेअरिंगपण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

You might also like