अजितदादांचा धडाका सुरूच, पहिल्याच बैठकीत बदललं ‘पुणे मेट्रो’चं नाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेव्हापासून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी अनेक बैठका आणि निर्णयांचा धडाकाच लावला आहे. आज अजित पवारांनी पुण्यात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मेट्रोसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात विशेष म्हणजे मेट्रोचे प्रस्तावित ६ कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने सुरू करण्याऐवजी आता सगळ्या कॉरिडॉरचे काम हे बरोबरीने सुरु करण्यासाठी डीपीआर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

तसेच पुणे मेट्रोच्या नावात बदल करण्यात आला असून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असं नाव करण्यात यावं अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. या बैठकीत पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा करण्यात येणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर ते माण असा वाढवण्यात येण्याचे देखील या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

तसेच निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले असून हडपसर ते स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खडकवासला ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. या दरम्यान वारजे ते शिवाजीनगर ह्या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान अजित पवारांनी असे विविध निर्णय घेऊन सरकारमध्ये आपणच ‘दादा’ आहोत असे सिद्ध करून दाखवलं.

तसेच अजित पवारांनी ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव दिले, वाडीया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावला आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/