‘या’ 3 नेत्यांचे आशिर्वाद असेपर्यंत सरकारला धक्का नाही : अजित पवार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड येथे बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेबाबत गौप्यस्फोट केला. यावरून वाद सुरु असून विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सावध उत्तर दिले आहे. सरकारमधल्या सगळ्या तिनिही पक्षांच्या विचारधारा या वेगवेगळ्या आहेत. या सरकारवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. या तीन नेत्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत काहीही होणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.

लवकर जाऊद्या तोंडातून एखादा शब्द जाईल अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, अजून माझे आणि अशोक चव्हाण यांचे बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ते नेमके काय बोलले ते मला समजू द्या. कारण एखाद्या गोष्टीची अर्थ ‘ध’ चा ‘म’ असा काढला जातो. त्यामुळे बोलताना खूप तोलून मापून बोलावे लागते. त्यामुळे लवकर जाऊ द्या नाहीतर माझ्या तोंडातून एखादा शब्द बाहेर जाईल, असे सांगत त्यांनी या वादावर बोलणे टाळले.

उद्धव ठाकरे, शरद पवार नाराज
अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहेत. सरकारमध्ये येताना शिवसेनेकडून घटनेप्रमाणे काम करणार असं लिहून घेतल्याचे वक्तव्या अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची सांगण्यात येत आहे.

अशी वक्तव्ये टाळावीत – मुख्यमंत्री
चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे अकारण गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये टाळावीत अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे बोललं जातंय. तसेच अशोक चव्हाण यांनी असे वक्तव्य का केले हे माहित नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सांगितले.