9 वी आणि 11वी चे विद्यार्थीही परीक्षेविनाच होणार पास !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक निर्बंध लावली जात आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे.

राज्य सरकारने यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता कोरोना काळात हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात शाळा सुरु नव्हत्या. अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग भरले होते. त्यानुसार, अनेक ठिकाणी चाचणी परीक्षा, प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा झाल्या नाहीत. तसेच अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न समोर होता. याशिवाय कोरोनाचे संकट थांबले नाही. या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन अखेर नववी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षेविनाच पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.