राज्यातील 10 वी च्या परीक्षा होणार, वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती

मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज (बुधवार) जाहीर केले आहे. दरम्यान राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्या पत्रकारांसोबत बोलत होत्या.

दरम्यान केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यर्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल ? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का ? यासंदर्भात सविस्तर माहिती मिळालेली नाही. मात्र 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता 1 जून रोजी सीबीएसईकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.