काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध ! ‘हे’ ठरले महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा संयुक्त जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, अनिल गोटे, बीआरसी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे-

– केजी टू पीजी मोफत शिक्षण
– कामगारांसाठी किमान वेतन 2100 रुपये
– मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ
– सर्वच महापालिकांमध्ये 500 फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ
– बेरोजगारांना 5 हजाराचा मासिक भत्ता
– आरोग्य विमा
– शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र फसवणूक झाली. याची अंमलबजावणी आम्ही करू.
– 80 टक्के नोकरी स्थानिकांना
– शैक्षणिक कर्ज शून्य टक्के

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “आम्ही जात पडताळणी प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक करणार. महिला बचतगटांना 2000 कोटींचा व्यवसाय उपलब्ध करू देणार आहोत. याशिवाय आम्ही सच्चर समितीची अंमलबजावणी आणि शहरीकरणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करणार आहोत”.

जयंत पाटील यांनी यावेळी युतीवर टीकाही केली. पाटील म्हणाले, “युती सरकारने 5 वर्षात राज्याला अधोगतीकडे नेले. 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी वाढली, अर्थव्यवस्था घसरली. अर्थव्यवस्था 13 टक्क्यांवरून 10.4 टक्क्यांवर आली.”

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र मिळून निवडणुक लढणार आहे. दरम्यान आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल असं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

नवाब मलिक म्हणाले होते, “काँग्रेस आणि राष्ट्रावादीने एकत्रित निडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष संयुक्तरीत्या जाहीरनामा देतील.” काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार होता. परंतु एकत्र निवडणूक लढण्याचे ठरल्याने तो कर्यक्रम रद्द करण्यात आला. दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत तर जाहीरनामाही एकत्र देऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने मान्यता दिल्यानंतर आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता. यानंतर अखेर आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे.

Visit : Policenama.com