‘वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले’, उध्दव ठाकरेंचा शरद पवारांवर ‘निशाणा’

वैजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवारांना सरकार पाडण्याचा अनुभव आहे, स्वत: च्या पक्षाच्या वसंतदादांच्या पाठीत वार करुन ते मुख्यमंत्री झाले होते अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बोलण्यासाठी नाही आलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलो आहेत. काही बोलघेवडे लोक आघाडी सोबत फिरत आहे त्यांना फिरू द्या. आम्हाला काहीतरी घ्यायचे म्हणून नाही तर काहीतरी द्यायचं आहे म्हणून आम्ही एकत्र आहोत. मतदार संघात भरपूर इच्छुक कार्यकर्ते असणे हे पक्षाचे वैभव आहे. सर्व इच्छुकांना मी धन्यवाद देतो. उमेदवारी दिल्यानंतर सर्व आपल्या इच्छा बाजूला ठेवून एकत्र आले. दोन्ही पक्ष वेगळे असले तरी विचार मात्र एक आहे. भगवा एक आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तान आम्हाला भगवा करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिर मुद्दा आहे परंतू आम्हाला माणूसकीने कारभार करायचा आहे. महायुतीचा यज्ञ आता राष्ट्रभरात पेटला आहे. माणसे शरीराने नाहीत तर मनाने मोठी होतात. येथील प्रकल्प अजून मार्गी लागला नाही, बेरोजगारांना अजून काम का नाही. बेकारांना आम्ही भत्ता देऊ. तरुणांना भत्ता नको काम हवे आहे. महाराष्ट्र मेहनत करणारा आहे, आम्ही तरुणांना काम देऊ, उद्योगधंदे उपलब्ध करुन देऊ. 80 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळवून देऊ. आपला हक्काचा माणूस किंवा परका माणूस यात बराच फरक आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवर देखील भाष्य केले, ते म्हणाले की, आम्ही कायम काम करत राहू, कधी स्वस्थ बसणार नाही याला म्हणतात शिवसेना आणि मित्रपक्ष. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करु.

काँग्रेसवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की काँग्रेसच्या कोणत्या नेत्यावर टीका करावी हे कळत नाही, कारण समोर कोणीही दिसतच नाही. सुशील कुमार शिंदे म्हणतात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस दोघे थकले आहे, इतकी वर्षी सत्तेत होते, म्हणून खाऊन खाऊन थकले. काँग्रेस नेते सलमान खूर्शीद म्हणतात की आम्हाला आमचे भवितव्य माहिती नाही. त्यांनाच जर त्यांचे भवितव्य माहित नसेल तर ते आपले भविष्य काय घडवणार असा सवाल उद्धव ठाकरे यांना काॅंग्रेस राष्ट्रवादीवर उपस्थित केला.

संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, जनता ठरवेल महाराष्ट्रात सरकार कोणाचे येणार.

visit : policenama.com