‘लिंबू ठेवणं ही अंधश्रद्धा नव्हे’, माजी संरक्षण मंत्र्यांकडून राजनाथ सिंह यांची पाठराखण ( व्हिडिओ )

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेलच्या चाकाखाली ठेवलेल्या लिंबांमुळे राजनाथ सोशल मीडियावर ट्रोल झाले. परदेशात जाऊन राजनाथ यांनी केलेल्या कृतीमुळे भारताबद्दल नेमका काय संदेश जगभरात गेला, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. मात्र राजनाथ सिंह यांच्या या कृतीला माजी संरक्षणमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पाठिंबा दिला आहे.

राजनाथ सिंह यांना समर्थन देताना निर्मला सितारमण म्हणाल्या की, ‘प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार काम करतो. विजयादशमीला शस्त्रपूजा ही आपली संस्कृती आहे. त्यांनी परंपरा पाळली, त्यात काही चुकीचे नाही. त्यांनी ओम लिहिला त्यात काय चुकीचे आहे? ही अंधश्रद्धा नाही.’

काँग्रेसच्या काळातील संरक्षणमंत्री आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या धर्म पद्धतीने देशासाठी संरक्षण सामुग्री ताब्यात घेताना पूजा केली होती. तेव्हा कोणी काहीही चर्चाही केली नाही. अशी टीका ए.के.अँटोनी यांचे नाव न घेता सितारमण यांनी यावेळी केली.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या राफेल विमानाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये पूजा केली. राजनाथ यांनी विमानावर ओम काढला आणि त्याच्या चाकाखाली लिंबूदेखील ठेवला. राफेलला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवणे हे जरा अतीच असून हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्राची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

visit : Policenama.com